अण्णा भाऊ साठे यांचे भाषण :  समकाळाच्या पार्श्वभूमीवर आकलन

▪️दि. २ मार्च १९५८ रोजी दादर (मुंबई) येथील मोरबाग रोडवरील बंगाली हायस्कूलच्या सभागृहात पहिले दलित साहित्य संमेलन भरले होते. या संमेलनाचे नियोजित उद्घाटक आचार्य प्र. के. अत्रे हे होते. मात्र काही कारणांमुळे अत्रे येऊ न शकल्यामुळे ऐनवेळी अण्णा भाऊ साठे यांना उद्घाटन करण्यासाठी विनंती करण्यात आली. अण्णा भाऊंनी संयोजकाची गैरसोय होऊ नये म्हणून उद्घाटक म्हणून येण्याचे कबूल केले. यावेळी उद्घाटक म्हणून अण्णा भाऊंनी जे भाषण केले, ते ऐतिहासिक स्वरूपाचे आहे. अण्णा भाऊंचे उपलब्ध असलेले हे एकमेव छापील भाषण आहे. या संमेलनाला आणि भाषणाला अनेकार्थाने महत्त्व आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वैचारिक अधिष्ठान ही दलित साहित्याची एक महत्त्वाची बाजू आहे. दलितांच्या सांस्कृतिक सत्तेसाठी डॉ. आंबेडकरांनी भक्कम अशी पार्श्वभूमी तयार करून ठेवल्यामुळेच दलितांच्या सामाजिक विषमतेचा इतिहास नोंदवला गेला. सामाजिक पुनर्रचना हे या साहित्याचे ध्येय आहे. म्हणूनच भाषेसह अनेक पारंपरिक बाबींना नाकारून दलित लेखकांनी स्वतःच्या अभिव्यक्तीसाठी नवा मार्ग निवडला आणि बहिष्कृत, वंचित समाजाची वेदना त्यांनी साहित्यात मांडली. दलित साहित्याला सुमारे साठ वर्ष होत आहेत. या पार्श्वभूमीवर पहिल्या दलित साहित्य संमेलनातील अण्णा भाऊ साठे यांचे भाषण हे अनेकार्थाने क्रांतिकारी होते. कारण दलित साहित्याचा नुकताच कुठे प्रारंभ होवू पाहत होता. सभोवती प्रतिकूल परिस्थिती होती. तरीही अण्णा भाऊ यांनी अत्यंत स्पष्टपणे  आपली भूमिका समोर ठेवली. वैचारिक बांधिलकी स्वीकारून, शोषितांच्या जगण्याला साहित्यात प्रथमच आणणाऱ्या अण्णा भाऊंसारख्या प्रतिभावंताच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन झाले. ही घटना प्रस्थापित सांस्कृतिक व्यवहारात महत्त्वाची वाटते.

       या संमेलनाचे उद्घाटन करताना अण्णा भाऊ साठे यांनी जो विचार व्यक्त केला, तो समकाळाच्या पार्श्वभूमीवर समजून घेतला तर लेखक असलेल्या अण्णा भाऊंचे विचार किती प्रगल्भ आणि मानवतावादी होते याचा प्रत्यय येतो. जेमतेम चार पृष्ठांचे हे भाषण आहे, पण तरीही या चार पृष्ठात अण्णा भाऊंनी जो समाजनिष्ठ आणि परिवर्तनाचा विचार मांडला तो पाहता अण्णा भाऊ समाज जीवनातील वास्तवाकडे किती सजगपणे पाहत होते याचा प्रत्यय येतो. ज्ञानाची, शिक्षणाची कोणतीच समृद्ध परंपरा वाट्याला न आलेल्या अथवा कोणताच वैचारिक वारसा नसतानाही अण्णा भाऊंनी मराठी साहित्यात जे भरीव योगदान दिले ते कालातीत आहे. ‘प्रतिभेला रंग, रूप, वर्ग, वंश, जातपात वा लिंगभेद यांची कुंपणे नसतात. ती स्फुरते कुण्याही सहृदयाला. अनुभूतीपुत अस्वस्थ आत्म्याला. प्रतिभेचे आजच्या औपचारिक शिक्षणावाचून तरी अडते कुठे ?’१ ( मधुकर आष्टीकर : १९९८) हे विधान अण्णा भाऊंनी अक्षरशः खरे ठरवले आहे.

        अण्णा भाऊंचे संपूर्ण चरित्र आपण पाहिले तर तो एका भव्य संघर्षाचा इतिहास आहे.  एका छोट्याशा गावात, अस्पृश्य जातीत जन्मलेल्या अण्णा भाऊंचे मुंबईत स्थलांतरित होणे आणि उपेक्षित, वंचितांच्या उत्थानासाठी लेखणी झिजवणे, जनआंदोलनात सक्रिय सहभागी होणे या सगळ्याच गोष्टी थक्क करणाऱ्या आहेत. अण्णा भाऊ हे खऱ्या अर्थाने उपेक्षित, वंचितांचे महानायक होते. त्यांनी सर्वसामान्यांच्या जगण्याचा हुंदका साहित्यातून प्रकट केला. या काळात पारंपरिक स्वरूपाचे रोमँटिक लेखन प्रचलित होते आणि अभिजन वाचक या रोमँटिक कथा, कादंबऱ्यांना डोक्यावर घेत होता. त्या काळात अण्णा भाऊंनी जगातील श्रमिकांचे, कष्टकऱ्यांचे प्रतिनिधित्व केले, ही घटना अपूर्व मानावी लागेल. अण्णा भाऊ हे बंद खोलीत बसून काल्पनिक गोष्टी लिहिणारे लेखक नव्हते, तर त्यांनी जे जगलंय, अनुभवलंय त्या भोवतालाला - तिथल्या माणसाला शब्दांकित केले. त्यामुळे अण्णा भाऊंचे लेखन हे जात, वर्ग संघर्षाचाही पहिला उच्चार होता. ते केवळ पूर्णवेळ लेखक नव्हते. समांतरपणे ते अनेक कार्यात सहभागी होत. लेखक, कवी, शाहीर, कलावंत, कार्यकर्ताही होते. त्यांनी ज्या ज्या क्षेत्राला स्पर्श केला त्या त्या क्षेत्रात त्यांनी आपली मुद्रा उमटवली.

            अण्णा भाऊंचा राजकीय आणि सामाजिक कालखंड पाहिला तर त्यांच्या कार्याचे थोरपण सहज लक्षात येऊ शकते. विशिष्ट स्वरूपाची भूमिका घेऊन अत्यंत गांभीर्याने वर्तमान प्रश्नांचा मागोवा घेणारा हा लेखक म्हणूनच आजही अत्यंत महत्त्वाचा वाटतो. कारण पारंपरिक स्वरूपाचे लेखन टाळून त्यांनी सामाजिक संघर्षाची नोंद केली. पोटापाण्याचा प्रश्‍न घेऊन ते वारणेतून मुंबईत दाखल झाले होते आणि महानगराने त्यांना एका नव्या जगाची ओळख करून दिली होती. कामगार चळवळीतला त्यांचा सक्रिय सहभाग त्यांच्यातल्या लेखकाला समृद्ध करणारा ठरला. ज्या  वास्तवात ते जगले, ज्या माणसांशी ते एकरूप झाले त्या माणसांचे चरित्रच त्यांनी आपल्या लेखनातून उलगडले. अण्णा भाऊ हे शाहिरी चळवळीचाही बुलंद आवाज होते. त्यांच्या ऐतिहासिक कामगिरीचेही नीट मूल्यमापन होण्याची गरज आहे. दुर्दैवाने त्यांचे वाङ्मयीन कर्तृत्व इथल्या सांस्कृतिक व्यवहाराने समजून घेतले नाही, त्यामुळे अण्णा भाऊंना साहित्याच्या इतिहासात त्यांच्या हयातीत महत्त्वाचे स्थान मिळू शकले नाही.

पण काळ हा कधीच स्थिर नसतो. काळ बदलतो - मूल्यव्यवस्था बदलते, साहित्यव्यवहार आणि प्रस्थापित मानदंड बदलतात आणि एक नवी समीक्षादृष्टी अस्तित्वात येते. मागच्या काही दशकात सुदैवाने या समीक्षादृष्टीला अण्णा भाऊंचे थोरपण लक्षात आले आणि त्यामुळे आज ते मराठी साहित्यविश्वातच नव्हे तर एकूणच जागतिक साहित्यात मानाचे लेखक ठरले. त्यांच्या लेखनाची, विचारांची आणि कार्याची समकालीनता, प्रासंगिकता अधिकाधिक अधोरेखित होत आहे, ही घटना महत्त्वाची वाटते. ‘अण्णा भाऊ साठे हे क्रांतिप्रवणतेचे कॉम्रेड होते. बंडखोरीचे निशान त्यांच्या खांद्यावर होते. जग बदलण्याची ईर्षा त्यांच्या अंगात होती. भूतकाळ व वर्तमानकाळ सर्वांचा नव्हता, ही गोष्ट खरी असली तरी; भविष्यकाळ मात्र सगळ्यांच्याच मालकीचा असणार, असा विश्वास त्यांनी आपल्या लेखणीला दिला होता’२ (जनार्दन वाघमारे: १९९३)

            अण्णा भाऊंच्या लेखनाला वैचारिक अधिष्ठान लाभले कसे? याविषयी अर्जुन डांगळे यांनी ‘लोकशाहीर अण्णा भाऊ साठे : निवडक वाङ्मय’ या ग्रंथात चर्चा केली आहे. ज्या काळात अण्णा भाऊ मुंबईत आले त्या काळात मुंबईत अनेक प्रकारच्या राजकीय चळवळी होत्या. म. गांधींपासून ते कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांच्यापर्यंत अनेक राजकीय नेत्यांचे कार्यक्षेत्र मुंबई हे होते. त्यामुळे या शहरात आणि विशेषत: कामगार, कष्टकऱ्यांचे प्राबल्य असणाऱ्या वस्तीत अण्णाभाऊ राहायला आल्यामुळे स्वाभाविकच या चळवळीचा प्रभाव त्यांच्यावर पडला आणि अण्णा भाऊ कम्युनिस्ट चळवळीचा एक भाग झाले. या चळवळीच्या माध्यमातून त्यांनी शाहीर अमर शेख, शाहीर गव्हाणकर यांच्यासह जे कार्य केले ते अभूतपूर्व म्हणावे लागेल. एकाच वेळी अनेक पातळ्यांवर काम करणाऱ्या अण्णा भाऊंनी कलेला आणि साहित्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. म्हणूनच युगप्रवर्तक लेखक, क्रांतिकारी लेखक, जागतिक कीर्तीचा जनवादी लेखक अशी त्यांची ओळख झाली. त्यांनी शाहिरी कलेचीही प्रतिष्ठा वाढवली.  संयुक्त  महाराष्ट्राच्या चळवळीतले त्यांचे योगदान विसरता येण्यासारखे नाही. केवळ ४९ वर्षाचे आयुष्य लाभलेल्या या लेखकाने जी साहित्यसंपदा मागे ठेवली ती पाहता त्यांच्या अफाट कार्याची, प्रतिभेची ओळख आपल्याला नव्याने होत आहे. परिवर्तन सन्मुख विचार देणाऱ्या या आधुनिक विचाराच्या लेखकाचे, त्यांच्या विचारांचे समकालीनत्व शोधण्याची गरज आहे.

▪️संमेलने कशासाठी? :  
अॅड. बी. सी. कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या पहिल्या दलित साहित्य संमेलनाचे उद्घाटन करताना अण्णा भाऊ साठे यांनी एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले ‘दलित साहित्यिकांचे वेगळे संमेलन भरवून हा सवतासुभा का उभा करता असा प्रश्न काही मंडळी करत आहेत’ असे प्रारंभीच अण्णा भाऊंनी नमूद करून दलित साहित्य संमेलनाच्या स्वतंत्र आयोजनामागच्या भूमिकेचे समर्थन केले. खरे तर महाराष्ट्रात १८७८ साली न्या. महादेव गोविंद रानडे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात पहिले साहित्य संमेलन भरले होते. अण्णा भाऊंच्या या भाषणापर्यंत म्हणजे १९५८ पर्यंत सुमारे ८० वर्षात ३९ संमेलने भरली होती. या संमेलनाचे अध्यक्षपद न्या. रानडे, कृष्णशास्त्री राजवाडे, महाजनी, कीर्तिकर, हरी नारायण आपटे, न. चिं. केळकर, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, शि.म. परांजपे,
श्री. व्य.केतकर, खाडिलकर, वि. दा. सावरकर, माधव ज्यूलियन, दत्तो वामन पोतदार, ना. सी. फडके, खांडेकर, माडखोलकर, वि. द. घाटे, अनंत काणेकर अशा दिग्गजांनी भूषविले होते. कोल्हापूर येथे १९३२ साली भरलेल्या संमेलनाचे अध्यक्ष महाराजा सयाजीराव गायकवाड होते. एवढा एक अपवाद सोडला तर सर्व संमेलनाध्यक्षपद हे ब्राह्मणी अभिजन परंपरेतलेच होते. या पार्श्वभूमीवर प्रस्थापित संमेलन संस्कृतीला छेद देऊन त्या काळातल्या लेखक कवींनी  एकत्र येऊन ‘दलित साहित्य संमेलन’ भरवावे ही घटना खूप महत्त्वाची होती. कारण दलित संमेलन म्हणजे रूढ  वाङ्मय व्यवहाराला एक मोठा छेद होता. ‘अशा संमेलनाची आवश्यकता काय?’ असा प्रश्न त्यावेळी ब्राह्मणी संस्कृतीकडून उपस्थित होणे स्वाभाविक होते. या प्रश्नाचे अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या भाषणात दिलेले उत्तर खूप महत्त्वाचे आहे. ते म्हणतात, “महाराष्ट्रापुरतेच जरी बोलायचे झाले तरी दलित माणसाचा मोठा वर्ग या महाराष्ट्रात अस्तित्वात आहे. त्यांचे जीवन वेगळे असून, इतर वर्गाशी ते संलग्न आहे. हा वर्ग या देशात अग्रेसर असून, त्यांच्या न्यायी संघर्षाचे परिणाम सर्व समाजावर होत असतात. तो या देशाचा सामाजिक, सांस्कृतिक पाया आहे. परंतु तो पिळला जाणारा नि कष्ट करणारा दलित म्हणून निराळा आहे, नि उपेक्षित आहे. आणि अशा दलिताला आपले जीवनाचे स्पष्ट प्रतिबिंब आजच्या मराठी साहित्यात दिसत नाही. आजचे साहित्य आरशासारखे स्वच्छ असावे त्यात आपले प्रतिबिंब स्पष्ट असावे एवढीच त्यांची मागणी आहे. आपला चेहरा आहे तसा दिसावा असं वाटणं गैर नाही.’

 ▪️लेखकाची भूमिका कोणती असावी ?:

    अण्णा भाऊंची लेखकीय भूमिका तर इथे स्पष्ट दिसतेच; पण दलित, वंचितांविषयीची कमालीची आस्थाही दिसते. इथल्या मराठी साहित्याने रंजनाच्या कल्पक भराऱ्या मारल्या. त्यांना खरा ‘माणूस’ दिसला नाही. पर्यायाने त्यांचे लेखन हे केवळ रंजनवादी ठरले. या साहित्यात सामान्यांचा चेहरा दिसत नाही. तो दिसायला हवा, एवढीच पण अत्यंत रास्त मागणी येथे अण्णा भाऊ नोंदवतात. ते  ‘जातीय, वर्गीय, हीतसंबंधाच्या पूर्णतया विरोधी आहेत. प्रखर बुद्धिवाद, समता, स्वातंत्र्य, विश्वबंधुत्व, समाजवादी विचार यांच्या वैचारिक साधनेवर अण्णा भाऊंचा वाङ्मयीन  दृष्टिकोन उभा आहे.’३ (बाबुराव गुरव : २०१०) दलितांच्या जीवन संघर्षाशी अण्णा भाऊंची नाळ जोडलेली आहे. त्यांचे दुःख, दैन्य  त्यांनी अनुभवलेले आहे. त्यामुळे जीवनसन्मुख लेखन करणाऱ्या अण्णा भाऊंना दीन दलितांचा कळवळा अस्वाभाविक नाही. म्हणून मराठी साहित्यात दलितांचे प्रतिबिंब दिसावे असे त्यांना वाटते. स्वातंत्र्यपूर्व काळातल्या बाबा पद्मनजी यांच्यापासून ते फडके - खांडेकर - माडखोलकर या लेखकांचा मोठा प्रभाव वाचकांवर होता. मात्र हे सगळेच लेखक एका समृद्ध सामाजिक पर्यावरणाचा भाग होते. त्यामुळे त्यांच्या लेखनातून दलित जीवनाचे प्रतिबिंब उमटत नव्हतेच. मनोरंजनाच्या प्रेरणेतूनच ही निर्मिती होत होती. अद्भुत, कल्पनारम्य आणि वास्तवापासून दूर असणारे हे लेखन होते. दलितांच्या जगण्याला समजून घेऊ शकणारे व्यापक आणि सर्वस्पर्शी संवेदन त्या काळातल्या लेखकांकडे नव्हते. त्यामुळे कमालीचे लोकप्रिय असणारे साहित्यिकही या सत्यापासून दूर होते. उपेक्षित, वंचितांच्या जीवनानुभवाला ते स्पर्श करू शकले नव्हते. विशेष म्हणजे अण्णा भाऊंचे या काळात मोठे लेखन होऊनही त्यांची यथायोग्य नोंद झालेली नव्हती. या पार्श्वभूमीवर ‘दलित साहित्याची’ आवश्यकता का आहे ?’  याचे जे उत्तर अण्णा भाऊंनी दिले ते मोठे अन्वर्थक म्हणावे लागेल. मार्क्सवादाच्या प्रभावामुळे या काळात थोडेफार दलित जीवनाचे चित्रण घडू लागले होते. आर्थिक विषमता आणि अन्य बाबीही साहित्यात येवू लागल्या होत्या. वर्गीय समाजरचना नष्ट करण्यासाठी या बाबी पुरेशा नव्हत्या. ‘दलित आजच्या समाजाचे हृदय आहे’ पण त्याच्या भावना कुणी समजून घेत नाही अशी खंत बोलून दाखवतानाच अण्णा भाऊ एक मौलिक विचार या भाषणात देतात. ते म्हणतात, ‘दलित वर्गाचे अथांग जीवन दिसण्यासाठी लेखकाला एक दिव्यदृष्टी असावी लागते. तो त्या वर्गाशी एकनिष्ठ असावा लागतो. तो वस्तुनिष्ठ असावा लागतो आणि त्याचा दलित वर्गाच्या सर्वन्यायी संघर्षावर नि त्याच्या अंतिम विजयावर विश्वास असला पाहिजे. म्हणजे तो लेखक हे ध्येयवादी असला पाहिजे नि त्याची कल्पकता ही अशीच हवी.’ सामाजिक बांधिलकी मानणाऱ्या अण्णा भाऊंचा हा दृष्टिकोण सामाजिक बदलासाठी महत्त्वाचा आहे. त्यांच्या अंत:करणात ममत्व आहे. दलितांची प्रगती व्हावी, त्यांना समानतेची वागणूक मिळावी ही त्यांची भावना आहे. अण्णा भाऊंनी भोवतालचे संघर्षशील जीवन अनुभवले होते त्यामुळे ते स्वतः विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन लिहीत होते.

     अण्णा भाऊंच्या आधीची पिढी ईश्वर, धर्म अशा तत्त्वांवर विश्वास ठेवणारी होती. पुढे पुढे मात्र या गोष्टींवरचा विश्वास कमी झाला असला तरी तो पूर्णपणे संपला नव्हता. अण्णा भाऊंवर मात्र मार्क्सवादी जीवनदृष्टीचा प्रभाव होता त्यामुळे एकूणच साहित्य व्यवहाराकडे पाहण्याची त्यांची एक स्वतंत्र दृष्टी होती. शोषणमुक्त आणि वर्गविहीन समाज हे त्यांचे ध्येय होते. त्यामुळे लेखकाकडे ‘दिव्यदृष्टी’ असावी हे त्यांचे विधान अर्थपूर्ण आहे. दलित माणूस किंवा उपेक्षित समाजगटातील माणूस हा नेहमी निर्भयपणे मृत्यूच्या आसपास वावरत असतो. कधी तो गगनचुंबी विजेच्या मनोऱ्यावर काम करतो तर कधी पोलादाचा रस करणाऱ्या भट्टीवर. त्यांची मृत्यूशी कधी गाठ पडेल हे सांगता येत नाही. या भाषणात त्यांनी एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. ते म्हणतात, ‘कधी कधी त्याची व मृत्यूची गाठ पडून हा दलित कष्ट करीत करीत मरण पत्करतो. सुरुंगांना पेट देता देता किंवा पोलादाच्या रसात बुडून मरणे, नाहीतर विजेच्या धक्क्याने मरणे, दिवाळे निघाले म्हणून शेअर बाजारात मरणे या मरणातील अंतर लेखकाने मोजून पहावे श्रेष्ठ मरण कोणते, हे निश्चित ठरवावे.’  विदारक अशा समाजवास्तवाची जाणीवच अण्णा भाऊ इथे करून देतात. कष्ट करता करता मरणारा माणूस आणि चंगळवादी - पराभूत माणूस यांच्यातलं मृत्यूचं अंतर लेखकाने मोजले पाहिजे, ही त्यांची भूमिका समजून घ्यायला हवी. कारण त्यांनी पाहिलेला दलित वर्ग हा इथल्या प्रस्थापित मूल्यांनी आणि जीवनव्यवहाराने उद्ध्वस्त झाला होता. पशूपेक्षाही वाईट अवस्थेत तो जगत होता. त्याला इथल्या व्यवस्थेने मानसिक गुलाम बनवले होते. जगण्यासाठी त्याला मोठा संघर्ष करावा लागत होता. अपमानीत जगणे आणि भाकरीचा संघर्ष वाट्याला आलेल्या माणसाच्या मृत्यूची किंमत लेखकाला कळावी,  ही भूमिका त्यांनी भाषणातून स्पष्ट केली आहे. ‘दलित माणूस हा निर्मितीक्षम असतो तो वास्तव जगात कष्टाचे सागर उपसून दौलतीचे डोंगर रचतो’ हे एक मोठे सत्यही त्यांनी इथे मांडले आहे.

            अण्णा भाऊंचे सामाजिक निरीक्षण खूप सूक्ष्म आहे. एक मानवतावादी व्यापक दृष्टी घेऊनच ते उपस्थितांना वास्तव जगण्याची जाणीव करून देतात. यातूनच त्यांची विचारवंत म्हणून भूमिका जशी दिसते तशीच त्यांची वाङ्मयीन दृष्टीही किती व्यापक आहे, याचा प्रत्यय येतो. अण्णाभाऊंचे हे भाषण स्वातंत्र्याचे एक दशक पूर्ण झाल्यानंतरचे आहे. त्यापूर्वी महात्मा गांधी यांची हत्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले धर्मांतर आणि त्यानंतर त्यांचे महानिर्वाण या देशपातळीवरील महत्त्वाच्या घटना घडून गेलेल्या आहेत. ‘जग बदल घालुनी घाव / सांगून गेले मला भीमराव’/ या अलौकिक गाण्यातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार त्यांनी लोकांपुढे ठेवला. गावगाड्याबाहेर राहणाऱ्या लोकांच्या मनात त्यांनी अस्मिता जागवण्याचा प्रयत्न केला. त्यांचे समग्र लेखन याची साक्ष आहे. स्वातंत्र्यानंतर एक दशक उलटल्यानंतरही वास्तव बदलत नाही याची त्यांना खंत होती. या भाषणात त्यांनी म्हटलंय, ‘एका झाडाखाली तीन दगडांची चूल करून मांडण्यात मडक्यात अन्न शिजवून दोन मुलं नि बायको यांना जगणारा हा वरवर कंगाल दिसत असला तरी त्याची संसार करण्याची इच्छा पवित्र अशीच असते. कुटुंबव्यवस्थेवरचा त्याचा विश्वास मुळीच ढळलेला नसतो परंतु त्याची कुटुंबसंस्थाच भांडवलदारी जगाने त्या झाडाखाली हाकलून दिलेली असते. त्याचे आम्ही निरीक्षण करावे, याची कारणपरंपरा शोधावी आणि मग त्या कंगाल दिसणार्‍याविषयी लिहावे; या समाजाची घडी न्  घडी त्या दलिताने व्यापली आहे.’

▪️वर्तमान प्रश्न :
अण्णा भाऊंच्या या भाषणाला २०१९ साली सुमारे ६२ वर्ष झाली आहेत. पण या भाषणात ज्या एका भयावह जगण्याला त्यांनी समोर ठेवले आहे, त्या जगण्यात आजही फारसा पडलेला आहे असे दिसत नाही. म्हणजे शिक्षण, नोकरी इत्यादी बाबींमुळे आज दलितांचे जीवन पुष्कळच उंचावले असले तरी सर्वच दलित, भटके – विमुक्त, आदिवासी वंचित समूहाचे प्रश्न संपलेले आहेत असे चित्र दिसत नाही. नव्या काळात स्पृश्य अस्पृश्यतेचेही संदर्भ बदलले आहेत. विशिष्ट वसाहतीत दलितांना घरे न विकण्याचा निर्णय बिल्डर घेतात. नोकरीच्या वा अन्य ठिकाणी छुप्या स्वरुपाची अस्पृश्यता, भेदभाव असतोच. आणि शिवाय तीन दगडांच्या चुलीचे चित्र अजूनही आपण बघतोच. पालात, फुटपाथवर किंवा अगदी उघड्यावर अन्न शिजवणारे, राहणारे लाखो लोक अजूनही आपल्या भोवतालात आहेत. जागतिकीकरणामुळे देशाचा मोठा भौतिक विकास झालेला असला तरी हा विकास सर्वांपर्यंत पोहोचला आहे, असे मात्र नि:संशय म्हणता येत नाही. शोषण, पिळवणूक आणि गुलाम बनविणाऱ्या अनेक शक्ती अजूनही आहेत. जात आणि धर्मनिरपेक्ष देश आपण अजूनही उभा करू शकलेलो नाहीत. विषमतामुक्त सर्वसमावेशक असे राष्ट्र आपल्याला निर्माण करता आलेले नाही. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या सात दशकांचा इतिहास आपण पाहिला तर, हा सगळा काळ  संघर्षाचा असल्याचे दिसेल. मंदिर, मशिद, दहशतवाद, वेगवेगळ्या धार्मिक- राजकीय अस्मिता, महापुरुषांच्या नावाने, विचाराने केले जाणारे राजकारण आणि सत्तेसाठी वाट्टेल ते करण्याची स्वार्थी मानसिकता या बाबींमुळे भूक, निवारा, बेरोजगारी अशा मूलभूत प्रश्नांची सोडवणूक आपण पूर्णांशाने अद्यापही करू शकलेलो नाहीत. पुरोगामी विरुद्ध प्रतिगामी असा वैचारिक लढा अद्यापही संपलेला नाही. दुर्दैवाने हा संघर्ष एकविसाव्या शतकात अधिक तीव्र झाल्याचे चित्र आहे. भयग्रस्त माणसं धर्माला चिकटून बसलेली आहेत. धर्म आणि  अंधश्रद्धेचा बाजार अधिक विस्तृत झाला आहे. या बाजाराला विशिष्ट स्वरूपाच्या विचारधारेचे लोक अधिक प्रोत्साहन देत आहेत. शोषक आणि शोषितांमधली दरी अधिकच रुंदावली आहे. मूल्यात्मक राजकारणाचा अभाव हे या काळाचे एक नकारात्मक चित्र आहे. नवी समाजव्यवस्था अस्तित्वात येऊनही दलित, वंचित, भटके- विमुक्त ,आदिवासी आणि अल्पसंख्यांकांच्या जीवनातील अनिश्चितता कमी झालेली नाही. सुखी, सुरक्षित आणि भयमुक्त जीवन अद्यापही त्यांच्या वाट्याला आलेले नाही. उलट बहुराष्ट्रीय कंपन्या, भांडवलदार विकासाच्या नावाखाली गोरगरिबांना त्यांच्या मूळ जगण्यापासून हुसकावून लावत आहेत. सत्ताधारी लोक एका आभासी आनंदात आहेत आणि सर्वसामान्यांचे प्रश्नही कायमच आहेत.

            ‘हे जग, ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नसून दलितांच्या तळहातावर तरलेली आहे’ हा अण्णा भाऊंचा विचार म्हणजे समाज व्यवस्थेतले एक कठोर सत्य आहे. भयमुक्त जगणार्‍या समाजाला एका वास्तवाची जाणीव करून देणाराही आहे. दलितांचे अस्तित्व नाकारणाऱ्या व्यवस्थेला त्यांच्या श्रमाचे महत्त्व पटवून देणारा आहे. प्रेम आणि करुणा उत्पन्न होऊन एका समतेची उद्घोषणाच जणू अण्णा भाऊ यांनी या भाषणात केली आहे. त्यांनी स्वीकारलेल्या मार्क्सवादी जीवनदृष्टीचा येथे प्रत्यय येतो. कारण ‘मार्क्‍सवाद हा मानवतावादी आहे. माणूस हा इतिहासाचा केंद्रबिंदू आहे आणि मानवी इतिहास त्याच्या मुक्तीचा इतिहास आहे असे मार्क्सवादाचे प्रमुख सूत्र आहे.’४ (बाबुराव गुरव : १९९१) अण्णा भाऊंना ज्या विचारपरंपरेचा आत्यंतिक आदर होता त्या विचार परंपरेने म्हणजेच कार्ल मार्क्स म. फुले, मॅक्झिम गार्की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून ते यशवंतराव चव्हाण, शाहीर अमर शेख, क्रांतिसिंह नाना पाटील यांनीसुद्धा सामाजिक संघर्षाच्या तत्त्वज्ञानाची ओळख समाजाला करून दिली. अण्णा भाऊंनी मांडलेला विचार हा या विचारपरंपरेचाच भाग आहे. ज्या समाजाच्या वाट्याला दाहक अनुभव आले त्या समाजाच्याप्रती त्यांच्या मनात कमालीची आस्था आहे. ‘दलितांविषयी लिहिणाऱ्यांनी प्रथम त्याच्याशी  एकनिष्ठ असले पाहिजे. लेखक हा सदैव आपल्या जनतेबरोबर असावा लागतो. जगातील सर्वश्रेष्ठ कलावंतांनी वाङ्मय हा जगाचा तिसरा डोळा मानला आहे आणि तो डोळा सदैव पुढे व जनतेबरोबर असणे जरूर आहे.’ ही भावना त्यादृष्टीने लक्षात घ्यायला हवी. विशेषत: समकाळातला सार्वत्रिक कोलाहल पाहता अण्णा भाऊंचे हे विधान किती महत्त्वाचे आहे, हे लक्षात येते. आविष्कार आणि विचार स्वातंत्र्याचा संकोच करू पाहणाऱ्या व्यवस्थेत वावरणाऱ्या लेखकाने ही बाब लक्षात ठेवायला हवी. ‘वाङ्मय हा जगाचा तिसरा डोळा आहे’ या विधानावरूनच  अण्णा भाऊंच्या सखोल चिंतनाची आणि त्यांच्या लेखकीय दृष्टिकोनाची कल्पना येते. म. फुल्यांनी शिक्षणाला तिसरा डोळा संबोधले होते. शिक्षणाच्या साक्षरतेमुळेच वाङ्मयाची निर्मिती होते आणि वाङ्मयाचा समाजावर दीर्घकालीन परिणाम होतो हे एक अंत:सूत्र इथे दिसते.

▪️भाषा, प्रांत आणि साहित्याविषयी आस्था:

‘परवा मराठी भाषेसाठी जनतेने जो अभूतपूर्व लढा संग्राम दिला, खऱ्या अर्थाने तो लढा मराठी साहित्यासाठीच होता नि आहे त्या लढ्यात सोळा सोळा वर्षाच्या मुलींनी आत्मबलिदान दिले. त्या लढ्यात जे कलावंत जनतेबरोबर होते, त्या कलावंतांना हा महाराष्ट्र कधीही विसरणार नाही.’ अण्णा भाऊ आपल्या भाषणात सतत लेखकाला त्याच्या कर्तव्याची जाणीव करून देतात. स्वतंत्र भारतात मरठी भाषिकांचे राज्य स्थापन करण्यासाठी ‘संयुक्त महाराष्ट्र चळवळ’ हा लढा उभारला गेला. या चळवळीमुळेच १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. मात्र त्यापूर्वी भाषावार प्रांतरचनेसाठी नेमलेल्या आयोगाने महाराष्ट्र राज्याची मागणी डावलली होती. या निर्णयाविरुद्ध संपूर्ण महाराष्ट्रात अस्वस्थता पसरली होती. ‘मुंबईसह महाराष्ट्र झालाच पाहिजे’ या घोषणेसह या चळवळीला प्रारंभ झाला. त्या काळातल्या बहुतेक राजकीय पुढाऱ्यांनी या लढ्याला समर्थन दिले होते. आचार्य अत्रे यांनी ‘मराठा’ तून या लढ्याला बळ दिले. ही चळवळ जशी राजकीय होती तशीच ती वैचारिक आणि साहित्यिक देखील होती. शाहीर अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या कलाविष्काराने मराठी अस्मिता जागृत ठेवली होती. यावेळी झालेल्या आंदोलनात तत्कालीन मोरारजी देसाई सरकारने सत्याग्रह आणि मोर्चात सहभागी असणाऱ्यांवर गोळीबार केला होता. या घटनेत दुर्दैवाने अनेकांना आपला जीव गमवावा लागला. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात सुमारे सुमारे १०५ जणांनी प्राणाची आहुती दिली. अण्णा भाऊ साठे यांचे या आंदोलनाला, चळवळीला खूप मोठे योगदान आहे. शाहीर अमर शेख, शाहीर गव्हाणकर यांच्यासह त्यांनी आपल्या शाहिरीच्या माध्यमातून हा लढा जनमानसापर्यंत पोहचवला. ‘माझी मैना गावाकडं राहिली माझ्या जीवाची होतीया काहिली’ या कवनातून त्यांनी महाराष्ट्राला साद घातली. संयुक्त महाराष्ट्राच्या आगेमागेच गोवा मुक्ती आंदोलन आणि दिल्लीतही मराठी आक्रोश मोर्चा निघाला होता. बेळगाव कारवार अशी इतर समांतर आंदोलने सुरूच होती. लाल बावटा कला पथकाच्या माध्यमातून अण्णा भाऊंनी या चळवळीला मोठी ऊर्जा दिली होती. मराठी माणसात नवचैतन्य जागृत केले होते. सामान्य माणसाला त्यांनी चळवळीच्या बाजूने उभे केले. ‘मराठी भाषेचं लोकशाही राज्य मानणारे ते प्रतिभावंत होते. त्यामुळे त्यांनी आपल्या लेखणी, वाणीतून ज्ञान आणि आनंद लोकांपर्यंत पोहोचविण्याचं व्रत आयुष्यभर संभाळलं.’५ (बा. ह. कल्याणकर : १९९६ )  मार्क्स, लेनिन यांचा विचार त्यांनी समजून घेतलेला होता. त्याविषयीचं त्यांचं आकलन सुस्पष्ट होतं. कारण रशियाच्या प्रवासातून त्यांनी एका नव्या जगाची सफर केली होती. तिथली संस्कृती आणि सभ्यता त्यांना माहीत होती.  त्यामुळेच श्रमिक वर्गाची बाजू घेऊन ते लेखन करत होते. चळवळ आणि साहित्य अशा दुहेरी जबाबदारीत ते अडकले होते. आपल्या भाषणात वारंवार एक गोष्ट ते बोलून दाखवतात ती म्हणजे ‘कलावंताने कायम जनतेबरोबर असायला हवे. कला ही वर्गतीत असावी.’ याचे मुख्य कारण म्हणजे ते उपेक्षित वर्गाचे प्रतिभाशाली लेखक होते. मध्यमवर्गीय नागरी भावविश्वापेक्षा त्यांना वंचितांचे जग अधिक प्रिय होते.

▪️समकालीन साहित्याची चिकित्सा:
अण्णा भाऊंनी त्यांच्या समकालीन लेखन परंपरेवरही आसूड ओढले आहेत. विशेषतः त्याकाळातील अत्यंत लोकप्रिय लेखक ना. सी. फडके यांच्या रोमँटिक लेखानाचा ते सडेतोड समाचार घेतात. फडक्यांना त्या काळात मोठी मान्यता होती. त्यांच्या कथा कादंबऱ्यांचे गारुड वाचकांवर होते. शरीरनिष्ठ प्रणयाला प्राधान्य देणाऱ्या त्यांच्या कथांना वाचकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. फडक्यांच्या कथा केवळ मनोरंजन करणाऱ्या होत्या. अण्णा भाऊंनी या भाषणात ना. सी फडके आणि त्यांच्या पत्नी कमला फडके ( पूर्वाश्रमीच्या दीक्षित ) यांच्या एकदोन कथेतील उदाहरणे देवून या ‘कथेपासून आम्ही काय शिकावे?’ असा प्रश्न उपस्थित केला आहे. अण्णा भाऊ ज्या जगाचे प्रतिनिधित्व करत होते ते जग आणि फडक्यांच्या कथा कादंबर्यातील जग यात खूप मोठे अंतर होते. समाजक्रांतीसाठी सर्वस्व पणाला लावणारे अण्णा भाऊ नेहमी मानवी मूल्यांसाठी झगडत होते. त्यामुळे फडक्यांचे मनोविश्लेषणवादी लेखन त्यांना रुचणे शक्य नव्हते. ‘हे सर्व मनोविश्लेषणवादी रापी घेवून माणसांची कातडी सोलू लागले आहेत. म्हणून हे दलितांचे वेगळे साहित्य संमेलन भरत असल्याचा’ निर्वाळा ते देतात. ‘आम्हाला गंगेसारखे नितळ साहित्य हवे आहे. आम्हाला मांगल्य हवे आहे. आम्हाला मराठी साहित्याच्या थोर परंपरेचा अभिमान आहे.’ असे म्हणतानाच ते महानुभावीय साहित्यिकांचा आणि ज्ञानेश्वरांसह संतपरंपरेचा गौरवाने उल्लेख करतात.

     चातुर्वर्ण्याची चौकट मोडून नवी समाजरचना आकाराला आणण्याचा पहिला प्रयत्न हा महानुभावीय लेखकांनी केला आहे. कर्मठपणाविरुद्ध बंड करणाऱ्या या पंथाने त्या काळात प्रस्थापितांविरुध्द संघर्ष केला होता. ‘रूढ, भोळ्या समजुती, विधिनिषेध यावर प्रहर केले. चक्रधरांनी परंपरागत चातुर्वर्ण्य व्यवस्थेला विरोध केला, सर्वांना संन्यास घेण्याची मोकळीक दिली. ब्राह्मण उत्तम किंवा महार- मंग अधम अशी कल्पना चुकीची आहे असा निर्वाळा त्यांच्या विचारबंधात सापडतो.’६( भालचंद्र फडके: २०००) त्यामुळे अण्णा भाऊ या पंथाचा आदरपूर्वक उल्लेख करतात.संत परंपरेनेही महाराष्ट्राला आणि मराठी भाषेला एक संपन्न वारसा दिला आहे. अध्यात्मिक समता प्रस्थापित करून जातिभेदाच्या भिंती आणि विषमता नष्ट करण्याचे मोलाचे कार्य केले आहे. समाजव्यवस्थेशी आजीवन संघर्ष केला आहे. आजही वारकऱ्यांच्या भक्तीचे महात्म्य कायम आहे. त्यामुळे महानुभाव आणि संत परंपरेच्या कार्याची, विचारांची अण्णा भाऊंना कल्पना होती. जात आणि धर्मभेदाला नकार देणारी जी विचारधारा फुले, आंबेडकरांनी महाराष्ट्रात रुजवली तेच कार्य अण्णा भाऊंनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून केले आहे. सामाजिक विषमता नष्ट करण्याचा आणि माणसाला माणूस म्हणून स्वीकारण्याचा त्यांचा प्रयत्न होता.

         ‘शब्दांना नुसता आकार देणे सोपे असते. त्या आकाराला आत्मा देणे त्याहून अधिक अवघड आहे. तेदेखील काही लेखकांनी सहज साधून जाते; पण त्या आत्म्यामागची इतिहास परंपरा शोधणे आणि तिचा अर्थ लावणे फार अवघड आहे.’ आचार्य अत्रेंच्या या विधानाचा अण्णा भाऊंनी भाषणात मुद्दाम उल्लेख केला आहे. दलित लेखकांनी या विधानाचा अर्थ समजून घेवून इतिहास परंपरा शोधण्याचा प्रयत्न करावा आणि ‘दलितांचे जीवन सुखी, समृद्ध होण्यासाठी दलिताला नि त्याच्या जीवनाला वरच्या पातळीवर नेण्याचा आपल्या कलेतून प्रयत्न करायला हवा’, असेही ते सुचवतात. अण्णा भाऊ इथे ‘दलित’ हा शब्द व्यापक अर्थाने वापरतात.

▪️अस्पृश्यतेविषयी मत :

           भाषणाच्या उत्तरार्धात त्यांनी अस्पृश्तेचा उल्लेख केला आहे. कारण त्याकाळात महाराष्ट्रात टोकाची विषमता होती. जातीयवाद होता. शोषणविरहीत समाजाचे स्वप्न पाहणाऱ्या अण्णा भाऊंना अस्पृश्तेचे चटके बसलेले होते. म्हणूनच वर्ग व जातविरहीत व्यवस्था असावी असे त्यांना वाटणे स्वाभाविक होते. माणसाचा सर्वांगीण विकास व्हावा, त्याला प्रतिष्ठा लाभावी असेही त्यांना वाटत होते. अमानवीय स्वरुपाची जातीय अस्पृश्यता त्या काळात भारतात होती. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शुद्र हे हिंदू धर्मात चार वर्ण आहेत. या वर्ण व्यवस्थेत अस्पृश्यता ही एक भयानक गोष्ट होती. भारतात एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात अस्पृशता निवारणाची मोठी चळवळ उभी राहिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी  १४ ऑक्टोबर १९५६ साली आपल्या लक्षावधी अनुयायांसह हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माचा स्वीकार केला. भारतीय घटना तयार करताना या बाबीकडे  विशेषत्वाने लक्ष देण्यात आले आहे. ‘भारतीय संविधानाच्या सतराव्या अनुछेदान्वये कायदा करून संसदेने गुन्हेगारास शिक्षा करण्याची व्यवस्था अपेक्षिली होती. त्याप्रमाणे १९५५ साली संसदेने एक सर्वंकष अधिनियम ‘अस्पृश्यता (गुन्हा) अधिनियम’ या नावाने मंजूर केला व तो दि. १ जून १९५५ पासून सर्व देशभर लागू झाला.’ (संदर्भ: विश्वकोश) असे असले तरी म्हणजे कायद्याने अस्पृशता पाळणे गुन्हा असला तरी प्रत्यक्षात मात्र अस्पृशता संपलेली नव्हती. त्यामुळे अण्णा भाऊ अस्वस्थ होते. त्यांनी आपल्या भाषणात म्हटलेय, ‘काही विद्वान म्हणतात, अस्पृश्यता कायद्याने नष्ट केली आहे. तेव्हा दलित हा प्राणी अस्तित्वात नाही. परंतु हा केवळ भ्रम आहे. एका गावात एका सार्वजनिक आडावर पाणी भरताना हिंदूंची काळिजे कशी धडधडतात’ या वास्तवाकडे ते लक्ष वेधतात.अजूनही हॉटेलमध्ये दलितांसाठी वेगळे कप ठेवले जातात याची खंतदेखील ते बोलून दाखवतात. जातीय मानसिकता ही सहजासहजी मनातून पुसून टाकता येणार नाही. त्यासाठी खूप वर्षे जावू द्यावी लागतील. कारण कोणतीही पारंपरिक समज तात्काळ नष्ट होत नाही, असे त्यांना वाटते. म्हणून ‘आम्ही दलित साहित्य निर्माण केले पाहिजे’ असे जाहीर आवाहन ते उपस्थितांना करतात. भाषणाच्या शेवटी त्यांनी जगप्रसिद्ध रशियन लेखक मॅक्झिम गॉर्की यांचे एक अवतरण उद्धृत केले आहे. ‘शब्दांनी कल्पनाच्या साधनावर उभारलेल्या या कलेचे खरे वैशिष्ट्य मानवी चुकांचे ज्ञान करून देणे हेच आहे, असे म्हणता येणार नाही. मानवाला त्याच्या बाह्य जीवनाच्या परिस्थितीतून वरच्या पातळीवर नेण्याचा प्रयत्न करणे, त्याला कमीपणा आणणाऱ्या वास्तव जगाच्या बंधनातून मुक्त करणे आणि तू गुलाम नाहीस, तू वास्तव जगाचा धनी आहेस, तू जीवनाचा स्वतंत्र निर्माता आहेस, असा साक्षात्कार मानवाला करून देणे हे वाड्मयाचे खरे वैशिष्ट्य आहे. या अर्थाने वाङ्मय सदैव क्रांतिकारक असते.’

           गॉर्की हे क्रांतिकारक लेखक होते. त्यांचा हा विचार उपस्थितांसमोर ठेवून अण्णा भाऊंनी खूप मोठा संदेश दिला आहे. गॉर्की यांनी लिहिलेले ‘मदर’ हे पुस्तक त्यांच्या लेखन प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे.या पुस्तकाचा नायक एक कामगार आहे. कामगार हा नायक असू शकतो हीच मुळात एक बंडखोर कल्पना होती.  त्यामुळे कामगार आणि कष्टकरी वर्गात या पुस्तकाने मोठे आत्मबळ निर्माण केले होते. आपल्या लेखणीने गोर्कीने जगभरात वादळ निर्माण केले होते कारण त्याने विषमता अनुभवली होती. परिवर्तन आणि क्रांतीचे जनक असणारे गॉर्की अण्णा भाऊंना वैचारिकदृष्ट्या जवळचे वाटणे स्वाभाविक होते. कारण दोघेही ‘नाही रे’ वर्गाचे प्रतिनिधित्व होते.वरील अवतरणातील गोर्कींचा विचार हा सर्व काळात आणि सर्व राष्ट्रात सारखाच लागू पडणारा आहे. अण्णा भाऊंनी गॉर्कीच्या या अवतरणाचा  उल्लेख करून असे म्हटले आहे की, ‘वरील अर्थाने परिपूर्ण असे साहित्य निर्माण करूया आणि या लेखण्या दलित चरणी अर्पूया!’

▪️समकाळाच्या पार्श्वभूमीवर विचार :

या समग्र भाषणाचा समकाळाच्या पार्श्वभूमीवर विचार केला तर अण्णा भाऊंनी साहित्य संमेलनाची आवश्यकता, लेखकाची बांधिलकी, लेखकाची भूमिका- ध्येयवाद, अस्पृश्यता, दलितांना समजून घेणे अशा अनेक मुद्यांना स्पर्श केला आहे. या छोट्याशा भाषणातून त्यांनी एक मोठा क्रांतिकारी विचारच मराठी साहित्याच्या पटलावर ठेवला आहे. या भाषणातला पुरोगामी आशय समजून घेण्याची गरज आहे. अण्णा भाऊंचा  वैचारिक दृष्टिकोन तर इथे दिसतोच, पण कलावंत म्हणून त्यांची भूमिकाही अधोरेखित होते. समतेचे मूल्य प्रस्थापित करू पाहणारे अण्णा भाऊ सर्वहारा वर्गाविषयी कळकळ व्यक्त करतात. उच्चनिचतेची उतरंड निर्माण करणाऱ्या जातिव्यवस्थेविषयी त्यांनी निर्माण केलेले प्रश्न महत्त्वाचे आहेत.  संवेदना हरवून बसलेल्या समाजाला त्याच्या कृत्याची जाणीव करून देतानाच हे भाषण दलित लेखकांना अंतर्मुख आणि कृतीप्रवण करणारे देखील आहे. दलित लेखकांनी आत्मविश्वासाने आणि स्वाभिमानाने लिहावे – सामाजिक मुल्यांची पुनर्रचना करावी आणि जात व्यवस्थेचे विध्वंसन करावे असा विचार देखील या भाषणात अंतर्भूत आहे. दलित साहित्य या संकल्पनेला अधिक प्रगल्भ बनवणारा हा विचार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेमुळे दलित साहित्याला एक तात्विक अधिष्ठान लाभल्यामुळे पुढच्या काळात या साहित्याने एकूणच भारतीय साहित्यात स्वतःचे स्थान निर्माण केले आणि दलितांच्या जगण्याचा एक व्यापक पट साहित्यातून आविष्कृत झाला.सामाजिक जाणिवेचे सूत्र घेवून या साहित्याने बौद्धिक चर्चा घडवून आणली. पारंपरिक स्वरूपाच्या साहित्याची चौकट नाकारून दलित लेखकांनी स्वतःचा मार्ग निवडला. अण्णा भाऊ हा मार्ग प्रशस्त करणारे सुरुवातीच्या काळातले महत्त्वाचे लेखक होते.

      आजच्या काळातील सामाजिक असहिष्णुता, धार्मिक आणि जातीय राजकारण, परस्परांमध्ये भिनत चाललेला द्वेष, विशिष्ट विचारधारांचे प्राबल्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच, सांस्कृतिक हितसंबंध आणि आपापल्या अस्मितांमुळे झालेले सामाजिक विभाजन ही चिंता करण्यासारखी बाब आहे. ‘अशावेळी लेखकाने जनतेसोबत असणे’ ही अण्णा भाऊ साठे यांची भूमिका किती महत्त्वाची आहे, हे ध्यानात येते. तळागाळातल्या माणसांचे चरित्र साहित्यातून आविष्कृत करणाऱ्या अण्णा भाऊंनी या भाषणातून मांडलेला विचार आपल्या समग्र सांस्कृतिक व्यवहारात खूप मोलाचा आहे.

▪️ संदर्भ :
१.      पहा: ‘लोकशाहीर अण्णा भाऊ साठे : निवडक वाङ्मय’, (संपादक: अर्जुन डांगळे आणि इतर). या ग्रंथातील मधुकर आष्टीकर यांचे निवेदन, प्रकाशक: महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई, प्रथमावृत्ती: १९९८
२.      जनार्दन वाघमारे, शाहीर अण्णा भाऊ साठे : (संपादक : प्राचार्य नागोराव कुंभार), प्रबोधन प्रकाशन, लातूर, प्रथमावृत्ती: जानेवारी १९९३, पृ.६२)
३.      बाबुराव गुरव: अण्णा भाऊ साठे, समाजविचार आणि साहित्य विवेचन, लोकवाङ्मयगृह, चौथी आवृत्ती: २०१०, पृ.६  
४.      तत्रैव
५.      बा. ह. कल्याणकर, लोकशाहीर तथा लोकलेखक अण्णा भाऊ साठे, (संपादक: आसाराम गायकवाड), झेप प्रकाशन, नाशिक , प्रथमावृत्ती:ऑगस्ट १९९६, पृ.३०१
६.      भालचंद्र फडके, दलित साहित्य वेदना व विद्रोह, श्रीविद्या प्रकाशन, पुणे, तिसरी आवृत्ती: २००० , पृ. ४५
७.      प्रस्तुत लेखातील अण्णा भाऊ साठे यांच्या भाषणांची अवतरणे ‘जनवादी साहित्यिक अण्णा भाऊ साठे’ या ग्रंथातून घेतली आहेत. (संपादक: डॉ. पी. विठ्ठल / डॉ. दुडूकनाळे) , डायमंड पब्लिकेशन्स, पुणे, प्रथमावृत्ती: २०१७

▪️डॉ. पी. विठ्ठल 🌿
इमेल : p.vitthal75@gmail.com 
---------------------

 पूर्वप्रसिद्धी : मुक्त शब्द,2020☝️

Popular posts from this blog

ग्रुप मध्ये राहण्यासाठी काही नियम व अटी

शिक्षणाची कास आणि ध्यास हिच पीईएसची देणगी: अशोक येरेकर